गोरगरिबांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद – गजानन गोळे व जय गजानन महिला सेवाधारी गटाचा उपक्रम कौतुकास्पद



केनवड (ता. रिसोड) — विकास लगड
दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि एकात्मतेचा सण असला तरी प्रत्येकाच्याच आयुष्यात हा उजेड समानतेने पोहोचत नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे अनेक गरजू कुटुंबांना या सणाचा आनंद लांबच राहतो. याच पार्श्वभूमीवर समाजातील वंचित घटकांपर्यंत आनंदाचा किरण पोहोचविण्याच्या हेतूने जय गजानन महिला सेवाधारी गट आणि गजानन गोळे यांच्या संयुक्त विद्यमाने केनवड येथे एक सुंदर सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या उपक्रमाअंतर्गत गावातील अनेक गोरगरिब कुटुंबांना दिवाळी फराळाचे साहित्य तसेच कपड्यांचे वाटप करण्यात आले. या निमित्ताने दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. गावातील सामाजिक बांधिलकीचे हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले.
कार्यक्रमाच्या वेळी संदीप राजे गोळे, भागवत गोळे, समाधान गोळे, सतीश गोळे, गजानन केनवडकर, विठ्ठल दि.गोळे, कैलास केनवडकर,
विठ्ठल अ. गोळे, गणेश नवघरे, अभिषेक गोळे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचविण्याची भावना जपण्याचे आवाहन केले.महिला सेवाधारी गटातील सर्व सदस्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. फराळाचे पॅकेट तयार करणे, कपडे वर्गीकरण करणे आणि वितरणाचे नियोजन या सर्व जबाबदाऱ्या महिलांनी अत्यंत मनोभावे पार पाडल्या. त्यांच्या या सहभागामुळे गावात उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
गजानन गोळे यांनी या वेळी सांगितले की, “दिवाळीचा खरा अर्थ म्हणजे इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरविणे. प्रत्येक गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे हीच खरी दिवाळी आहे.”
या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, गावातील नागरिकांनी गजानन गोळे आणि जय गजानन महिला सेवाधारी गटाचे मनापासून आभार मानले आहेत.
अशा उपक्रमांमुळे समाजात संवेदना, एकोपा आणि मदतीची भावना दृढ होत असल्याचे सर्वांचे मत आहे.


