डीएनएस कोचिंग क्लासेसतर्फे अनोखा उपक्रम – १२ तास स्टडी सर्कल

डीएनएस कोचिंग क्लासेसतर्फे अनोखा उपक्रम – १२ तास स्टडी सर्कल
परभणी (वार्ताहर) –
गंगाखेड रोड, शांतिनिकेतन कॉलनी येथील डीएनएस कोचिंग क्लासेस मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विशेष ओळख निर्माण करून बसले आहे. विद्यार्थी समितीच्या पुढाकारातून दरवर्षी स्तुत्य व उपयुक्त उपक्रम राबवले जातात. याही वर्षी सलग दहा दिवस विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी आणि अभ्यासातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आज एक वेगळाच उपक्रम पार पडला. “१२ तास स्टडी सर्कल” या शीर्षकाखाली विद्यार्थ्यांनी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या वेळेत अखंड अभ्यास केला. विशेष म्हणजे हा उपक्रम गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात आला असल्याने विद्यार्थ्यांनी गणरायासमोर बसून अभ्यास करून विद्येची देवता गणपती बाप्पाला अनोखी मानवंदना अर्पण केली.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अभ्यास करताना दिसलेली त्यांची शिस्त, एकाग्रता आणि ज्ञानलालसा याचे कौतुक पालक, शिक्षक तसेच समाजातील विविध स्तरातून होत आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढत नाही तर विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता, वेळेचे महत्त्व आणि आत्मविश्वास देखील वाढतो, असे मत पालकांनी व्यक्त केले.
डीएनएस कोचिंग क्लासेसने राबवलेला हा अभिनव प्रयोग परभणीतील इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी
ठरत आहे.