हिंगोलीत राजकीय बदल : माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदेसेनेत, भास्करराव बेंगाळ यांचाही प्रवेश

हिंगोलीत राजकीय बदल : माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदेसेनेत, भास्करराव बेंगाळ यांचाही प्रवेश
हिंगोली प्रतिनिधी – केशव अवचार
हिंगोली जिल्ह्यात मोठा राजकीय बदल घडला असून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आणि त्यांचे कट्टर समर्थक भास्करराव बेंगाळ यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

माजी आमदार गोरेगावकर यांनी तीन वेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मागील निवडणुकीत हिंगोलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते काहीसे नाराज होते.

गेल्या काही दिवसांपासून आमदार संतोष बांगर आणि माजी आमदार गोरेगावकर यांच्यात सलग गाठीभेटी होत असल्याने त्यांच्या शिंदेसेनेत प्रवेशाची चर्चा रंगली होती. अखेर १२ ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी समर्थकांची मते जाणून घेतली. कार्यकर्त्यांनीही त्यांच्या निर्णयास पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला.

आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार गोरेगावकर यांचा पक्षप्रवेश झाला. या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

या कार्यक्रमाला आमदार संतोष बांगर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटील गोरेगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख रमेश कदम, संजय देशमुख, द्वारकादास सारडा, भास्करराव बेंगाळ, क्रांतिवीर हवळे, अमोल खिल्लारी, बालाजी गावडे, रुपाजी पाटील, मदन शेळके, धिरज देशमुख, अमोल जमदाडे, गजानन पोहकर, शेख नईम, शेख नोमान, खुशालराव हराळ आदी मान्यवर उपस्थित होते.

माजी आमदार गोरेगावकर यांच्या पक्षप्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात शिंदेसेनेला मोठे बळ मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेसेनेला लाभ होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे



