शिव पांदण रस्ते विषयक मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद घ्यावा – आमदार भावना गवळी पाटील यांचे आवाहन.

शिव पांदण रस्ते विषयक मोहिमेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद घ्यावा – आमदार भावना गवळी पाटील यांचे आवाहन
वाशिम :- शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला महत्वाचा विषय म्हणजे शिवारातील पांदण व शिवरस्ते. या रस्त्यांना विशिष्ट क्रमांक मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, याविषयी सुरू झालेल्या मोहिमेला जिल्हाभरातून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आमदार भावना गवळी पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पारदर्शक व लोकाभिमुख कार्यप्रणालीचा भाग म्हणून नक्शावर असणारे व नक्शावर नसणारे अशा दोन्ही प्रकारच्या पांदण व गाव रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजित सेवा पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत महसूल विभागामार्फत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत गावातील पांदण रस्त्यांचे सर्व्हेक्षण करून नकाशे तयार केले जाणार असून, ते नागरिकांना व ग्रामपंचायत तसेच तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या उपक्रमातून शेतकऱ्यांना शिवारातील रस्त्यांना वैध क्रमांक मिळून वादावादीला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
👉 आमदार गवळी पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे.