वाळुजच्या शाळेत RTE विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण

वाळुजच्या शाळेत RTE विद्यार्थ्यावर अमानुष मारहाण
गंगापुर, जि. छत्रपती संभाजीनगर – राजश्री प्राथमिक विद्यालय, वाळुज येथे शिक्षण घेत असलेल्या RTE अंतर्गत प्रवेशित ऋतुराज मिलिंद कांबळे या मागासवर्गीय (बौद्ध) विद्यार्थ्यावर शिक्षकांनी अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सदर विद्यार्थी RTE कोट्यातून प्रवेश घेतल्यामुळे शाळेतील शिक्षक व संस्था चालक यांच्याकडून त्याला सतत दुय्यम वागणूक दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर एका शिक्षकाने विद्यार्थ्याला वर्गातून बाहेर काढून काठी तुटेपर्यंत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीदरम्यान विद्यार्थी शिक्षकाच्या पाया पडून दया मागत होता, तरीही शिक्षक शहा यांनी अमानुष वर्तन चालूच ठेवले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या प्रकाराबाबत पालकांनी संस्था चालक सुरेश वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही सहानुभूती व्यक्त केली नाही, उलट प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे.
याशिवाय शाळेत RTE विद्यार्थ्यांकडून बेकायदेशीरपणे फी आकारली जाते, फी ऑनलाईन स्वीकारली जात नाही, शाळेत खेळाचे मैदान नाही, तसेच शिक्षणाऐवजी उत्सवांना प्राधान्य दिले जाते, अशीही गंभीर तक्रार पालकांनी केली आहे.
स्थानिक समाजकार्यकर्त्यांनी या घटनेची दखल घेत जातीयवादी संस्थेविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित शिक्षक व संस्था चालक यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा व RTE कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.