हडपसर रामटेकडी परिसरात चोरांचा धुमाकूळ गेल्या २० दिवसांत १२ ते १५ घरफोड्या

हडपसर रामटेकडी परिसरात चोरांचा धुमाकूळ — गेल्या २० दिवसांत १२ ते १५ घरफोड्या
हडपसर (प्रतिनिधी प्रेमनाथ यादव, हवेली) –
रामटेकडी परिसरात गेल्या वीस दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत १२ ते १५ घरांमध्ये दिवसा कोणी नसतानाचा गैरफायदा घेत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे.
श्रीमती कमल प्रल्हाद लोंढे (रा. रामटेकडी) यांच्या घरात चोरीचा प्रकार घडला. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात घुसून पितळी व तांब्याची भांडी तसेच अंदाजे अडीच ते तीन लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नागरिक प्रचंड संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी देखील अनेकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचे समजते. मात्र, “तपास सुरू आहे,” “सबुरी ठेवा” अशा साच्याचं उत्तर देत पोलीस नागरिकांना फक्त धीर देत आहेत.
“सामान्य जनतेचं जगणं हराम झालं आहे, घरात कोणतीही सुरक्षा राहिलेली नाही. पोलिसांनी यावर तातडीने कारवाई करून चोरट्यांना पकडावं,” अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पोलीस प्रशासन याबाबत गंभीरतेने लक्ष घालणार का, आणि या चोरांवर बंदोबस्त होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.