वटसावित्री दिनी “लिंगसमभाव हितगुज मैत्रिणीशी” ऑनलाईन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

वटसावित्री दिनी “लिंगसमभाव हितगुज मैत्रिणीशी” ऑनलाईन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती, दि. १० जून २०२५ — महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जिल्हा अमरावती महिला विभागाच्या वतीने वटसावित्रीच्या दिवशी “लिंगसमभाव हितगुज मैत्रिणीशी” या ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विदर्भातील अनेक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र अंनिस महिला विभागाच्या राज्यकार्यवाह मा. गायत्री आडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून विवेकवाहिनी अमरावतीच्या प्रा. डॉ. मंदा नांदुरकर यांनी मार्गदर्शन केले. हितगुज सत्रासाठी मा. वंदना खडतकर आणि मा. स्नेहल वानखडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात मा. शंतनू पांडव यांनी वटसावित्री सण व स्त्री विषमता यावर प्रश्न उपस्थित करून आणि हितगुज साधून केली. त्यानंतर प्रा. डॉ. मंदा नांदुरकर यांनी वटसावित्री सणाचा ऐतिहासिक संदर्भ, सामाजिक वास्तव, लिंगसमभावाची गरज, स्त्री-पुरुष समानता, स्त्री जन्माचे स्वागत आणि पर्यावरणस्नेही जीवनशैली या विषयांवर गीत, कविता आणि उदाहरणांच्या माध्यमातून मनोज्ञ मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगत मा. गायत्री आडे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कीर्तिका सयामे यांनी केले. परिचय शंतनू पांडव यांनी तर गीत सादरीकरण सुनीता पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन श्वेता कोल्हे यांनी मानले.
या कार्यक्रमात विदर्भातील विविध जिल्ह्यांतून महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.